टीडीआर घोटाळा प्रकरण, मोठ्या माशांना वाचविण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव?

Foto

औरंगाबाद- महानगरपालिका भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला दिला असताना बनावट कागदपत्रे तयार करून टीडीआर मिळविण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने माजी नगरसेवकाला यापूर्वीच अटक केली आहे. या प्रकरणात बुधवारी शाखा अभियंता आणि लिपिकास अटक केली. परंतु डीटीआर घोटाळ्याला जबाबदार असलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना मात्र राजकीय दबावापोटी जाबजबाब घेऊन सोडून देण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

 

महानगरपालिकेत बनावट कागदपत्रे सादर करून टीडीआर मिळविण्याचा प्रकार तत्कालीन आयुक्‍त ओमप्रकाश बकोषरिया यांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणी पोलिस तक्रार देण्याचे आदेश संबंधितांना दिले होते. बकोरिया यांच्या आदेशानुसार शाखा अभियंता प्रभाकर पाठक यांनी २१ नोव्हेंबर २०१६ रोजी सिटीचौक ठाण्यात तक्रार दिली होती. सदरील प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी देण्यात आले होते. मंजूरपुरा  ते विश्‍वासनगर १५ मीटर रस्ता रुंदीकरण भू-संपादन करण्यात आले. अब्दुल साजिद यांची १४४.८० चौ. मीटर भू-संपादन करण्यात  आली.  त्याच्या मोबदल्यात ८ लाख २५ हजारांचा आर्थिक मोबदला देण्यात आला होता. परंतु साजेद यांच्या निधनानंतर त्याचा मुलगा माजी नगरसेवक अब्दुल सिकंदर अब्दुल साजेद याने बनावट कागदपत्रे तयार करून टीडीआर मिळविण्याचा अर्ज मनपाला सादर केला;पण या प्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार केली. त्याची दखल तत्कालीन मनपा आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांनी घेतली होती. बकोरिया यांच्या आदेशाने पोलिसात तक्रार दिली.

 

त्यानंतर हे प्रकरण दोनवर्षे तपासासाठी पडून होते. या प्रकरणी माजी नगरसेवक अब्दुल सिकंदरला अटक केली. त्यानंतर काल शाखा अभियंता शिवदास राठोड व लिपिक महंमद अजहर अली यांना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना जबाब देऊन सोडून दिले. पोलिस प्रशासन राजकीय दबावाखाली तपास करीत आहे, असे कर्मचार्‍यांमध्ये बोलले जात आहे. मोठ्या माशांना राजाश्रय असल्याने त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याचे कर्मचार्‍यांमध्ये बोलले जात आहे. त्यामुळे पोलिस आयुक्‍तांनी या प्रकरणात लक्ष घालून घोटाळेबाजांना शिक्षा करावी, असे बोलले जात आहे.